कृषीवार्ता
प्रवरासंगम येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन
महामार्गावर ओतले दूध; आंदोलन अधिक तीव्र करणार : अंबादास कोरडे यांचा इशारा
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील प्रवरासंगम गावात शेतकऱ्यांनी दूध ओतून आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे यांनी सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे म्हणाले की सर्व दूध उत्पादनाचा खर्च वाढला असून पशुपालक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढत असताना दुसऱ्या बाजूला दुधाचे दर कोसळत आहेत. यासाठी भेसळयुक्त कृत्रिम दूध तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी व तातडीने दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी. अशी डॉ. ढगे यांनी मागणी केली.
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते जगन्नाथ कोरडे यांनी दूध उत्पादकांच्या व्यथा मांडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 48 रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 58 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली. शेतकरी संघटनेच्यावतीने जोरदार घोषणा करण्यात आल्या.
कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब नाबदे, रामकृष्ण कोरडे, जगन्नाथ कोरडे, संतोष पंढरीनाथ कोतकर, संदीप गवारे, दिलीप मोटे, नानासाहेब कसोटे, दौलतराव गंगे, बापूसाहेब डावखर व पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.