आरोग्य व शिक्षण
इंडियन टॅलेंट ऑलंपियाडमध्ये ‘सेंट मेरीज’चे यश
शाळेच्या विद्यार्थ्यांकडून बक्षिसांची लयलूट
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहरातील अहिल्यानगर येथील सेंट मेरीज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलंपियाडद्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून संपूर्ण राज्यात यशाचा डंका मिरवला आहे. या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात इंडियन टॅलेंट ऑलंपियाडने संपूर्ण देशात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर आधारित वर्गानुसार दुसऱ्या फेरीत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत सेंट मेरीज स्कूलच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर वर्गानुसार, विषयातील सहभागानुसार अनेक बक्षीसे तर मिळवलीच परंतु राज्य पातळीवर आपल्या उत्तुंग यशाचा ठसा उमटविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाडतर्फे 700 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंतची रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
अर्शिन इनामदार व आरोही सुडके यांनी अनुक्रमे सामान्य ज्ञान व चित्रकला विषयांमध्ये राज्यात द्वितीय स्थान मिळविले असून दोन हजार रुपये शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वेदिका डमाळे सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यस्तरावर तिसरा नंबर मिळवून बाराशे रुपये शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे तर समृद्धी कपिले राज्यात पाचव्या स्थानावर असून तिने एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवली आहे. इतर विद्यार्थ्यांमध्ये सिल्विया सोनकांबळे, प्रणाली बोरुडे, मित ललवाणी, अब्दुलगणी शेख, अभिजीत कुलट, गौतमी होले, अन्वी सुडके, योगेश भगत, स्नेहल कोकरे यांनी एक्सलेन्स अवॉर्ड प्राप्त केले आहे तर अलीझा शेख, रझिन शेख, अनुष्का खराडे, प्रणव ढगे या विद्यार्थ्यांनी क्लास टॉपरचा बहुमान प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे शाळेचे मुख्याध्यापिका सिस्टर जोसी, व्यवस्थापिका सिस्टर मौली, सिस्टर लिसा, परीक्षा नियंत्रक विजय लोंढे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहे.