ब्रेकिंग
अजूनही प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संताप; दहा महिन्यांपासून भत्ते प्रलंबित; 4 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय कागदावरच

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही. तो त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. महिला बालकल्याण विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहीत धरले जाते. मात्र, त्यांना कामाचा मोबदला द्यायची वेळ येते तेव्हा विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो. यावर नाराज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबरपासूनचा प्रलंबित असलेला प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणी केली आहे.
अंगणवाडी सेविकांना दरमहा १३,०০০ रुपये आणि मदतनिसांना ७,५০০ रुपये मानधन दिले जाते. मागील वर्षी ४ ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेविकांना मासिक २०००, तर मदतनिसांना १००० रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय सरकारने काढला होता. परंतु या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासूनचा प्रोत्साहन भत्ता जुलै महिना संपत आला तरी अजूनही मिळालेला नाही.
प्रलंबित प्रोत्साहन भत्याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा विभाग, अहिल्यानगरशी संपर्क साधला असता, विभागाने सांगितले की, आतापर्यंत सरकारकडून प्रोत्साहन भत्त्यासाठी कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही.
बालकाच्या सर्वांगीण विकासामध्ये अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत, अंगणवाडी सेविका व मदतनीस या गर्भवती महिला, स्तनदा माता, सहा महिने ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांना पोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण सेवा प्रदान करतात. याशिवाय, लसीकरण, आरोग्य जागरूकता, योजनांची अंमलबजावणी अशा अनेक सरकारी कामांमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका यांची ११०५५६, अंगणवाडी मदतनीस यांची ११०५५६ अशी एकूण २२१११२ मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत.
शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती स्त्रिया, स्तनदा मातांना आहार देणे व तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे काम अंगणवाड्यांमार्फत केले जाते. तसेच आरोग्यसेवा, लसीकरण मोहिमा आणि विविध योजनांबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात. अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधने नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे.
सरकारने घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता खूपच कमी आहे आणि तोही अनेक अटी शर्तीवर देण्याची तरतूद आहे. भत्ता दरमहा कोणत्याही अटीशिवाय वेळेवर देण्यात यावा, अन्यथा पुढील महिन्यात जिल्हाभर आंदोलन सुरू केले जाईल. -मदिना शेख अध्यक्ष, अहमदनगर आंगनवाड़ी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियन.



