ब्रेकिंगमहाराष्ट्र
एसटी बसमध्ये महिलांसाठी ‘हाफ तिकीट’
महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वाहनांत मिळणार लाभ; महिलांमध्ये आनंदाचे वातावरण
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय शुक्रवार (दि.17) मार्चपासून लागू झाला आहे. ज्यामध्ये सर्वस्तरातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करतांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला होता. निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या योजनेला ‘महिला सन्मान योजना’ या नावाने संबोधित करण्यात आले आहे.
सरकारच्या या निर्णयाचे अर्ध्या लोकसंख्येकडून स्वागत होत आहे. एसटी महामंडळालाही फायदा होणार आहे. एसटी बसेसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. या निर्णयामुळे महिलांचे माहेरी जाण्याचे प्रमाण वाढणार आहे. दिलेल्या सुविधेचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे महिलांबरोबरच एसटी महामंडळालाही फायदा होणार आहे. एसटीचे अर्थचक्र देखील पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल.
दरम्यान, अधिकाधिक महिलांनी ‘महिला सन्मान योजने’चा लाभ घ्यावा व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करण्याचे आवाहन नेवासा आगाराकडून करण्यात आले आहे.

मी श्रीरामपूर ते नेवासा दररोज प्रवास करते. सकाळी एसटी प्रवासादरम्यान वाहकाकडे 60 रुपये प्रवास भाडे दिल्यानंतर त्यांनी 30 रुपये परत केले. तसेच महिलांसाठी 50 टक्के सवलत सुरू झाल्याबद्दल सांगितले. जे माझ्यासाठी खूप आनंददायी होते. ~रेश्मा लोखंडे बस प्रवासी, श्रीरामपूर.

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा शासनाचा स्तुत्य निर्णय आहे. विविध स्पर्धा आणि इतर परीक्षांसाठी जाणाऱ्या युवकांनाही परीक्षेच्या दिवशी त्यांचे प्रवेशपत्र दाखवून एसटी प्रवासातही सुविधा मिळावी. –योगिनी बनगर नेवासा