ब्रेकिंग
खोट्या गुन्ह्यातील नाव वगळा
नेवासा वकील संघाची मागणी; अँड. संजय सुखदान यांचे नाव वगळण्यासाठी निवेदन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुका वकील संघाचे सदस्य अँड. संजय सुखधान यांचेवर तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आकसबुध्दीने दाखल केलेल्या खोटया गुन्हयातून नाव वगळण्यात यावे, अशी मागणी नेवासा वकील संघाच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनला नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना शनिवार (दि. 9) निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात वकील संघाने म्हटले आहे की नेवासा तालुका वकील संघाचे सदस्य अँड. संजय लक्ष्मण सुखधान हे नेवासा न्यायालयात प्रक्टिशनर वकील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे त्यांचे परिचित असलेले व त्यांचे पक्षकार कडुबाळ कुटे हे सायंकाळच्या वेळेला त्यांचे कार्यालयात आले. त्यांनी सुखदान यांना सांगितले की माझ्याकडून नेवासा-श्रीरामपूर रोडवर एका महिलेला धक्का लागला. ती महिला खाली पडली. तेव्हा मी घाबरुन घरी निघून गेलो. त्यावरुन अँड. संजय सुखधान यांनी वकील या नात्याने त्यांचे पक्षकाराला सांगितले की जो काही प्रकार घडला असेल तर स्वतःहून पोलिस स्टेशनला जाऊन खबर द्या, पोलीस कायदेशीर कारवाई करतील.
परंतु पक्षकाराने सांगितले की आम्ही स्वतः पोलिसांकडे गेलो तर पोलीस आम्हाला पैसे मागतील त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर चला, असे सांगितल्याने अँड संजय सुखधान हे त्या पक्षकाराबरोबर नेवासा पोलीस स्टेशनला गेले होते.
अँड. संजय सुखधान हे वकील असून एक चांगले समाजसेवक आहे. त्यांच्या पत्नी सौ. शालिनी सुखधान हया नेवासा नगरपंचायतच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे कुटुंबाचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असतो. ते सामाजिक प्रश्नावर व अन्यायाविरुध्द सातत्याने आवाज उठवत असतात. त्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे गैरकारभाराविरुध्द आवाज उठवलेला होता व त्यांचे विरुध्द विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक यांचेकडे ता. ०८/०७/२०२४ रोजी तक्रार केलेली आहे.
तेव्हापासून त्याचे शल्य पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मनाला डाचत होते. जाधव यांनी बदलून जातांना जाणीवपूर्वक वैयक्तिक आकसापोटी द्वेषभावनेतून ए.पी.आय. अमोल पवार यांना पुढे करून अँड. सुखधान यांचेवर नेवासा पोलिस स्टेशनला खोटा गुन्हा गु.र.नं.१-७३१/२०२५ भा. न्या.सं. कलम २२९ (२), २३६, २३७, २३८, २४०, ३ (५) व ६१ (२) वगैरे कलमान्वये दाखल केलेला आहे. या प्रकारामुळे नेवासा तालुका वकील संघाच्या सर्व सदस्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत.
वकील संघाच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अधिकाराचा गैरवापर करुन वकीलाचे नाव या गुन्हयात जाणीवपुर्वक व आकसबुध्दीने सामील केलेले आहे. सदरचा प्रकार हा निंदनीय असून वकिलांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला इजा पोहोचवणारा आहे. वकिलांनी पक्षकारांना सल्ला दिला असेल तरी त्यांना एखाद्या गुन्हयात आरोपी करता येत नाही, असा महत्वाचा न्यायनिवाडा नुकताच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
याची माहिती पोलीस निरीक्षक यांना असतांना देखील त्यांनी वर नमुद कृत्य केलेले आहे. सदर गुन्हयाशी अँड. संजय सुखधान यांचा दुरान्वये कोणताही संबंध नसल्यामुळे त्यांचे नाव या गुन्हयातून वगळण्यात यावे. पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिकाराचा गैरवापर करुन खोटया गुन्हयात त्यांना अडकवून खोटा गुन्हा दाखल केला म्हणून त्यांची आठ दिवसाचे आत चौकशी करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे सदर प्रकरण पाठविण्यात यावे व त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा वकील संघाच्या पुढील बैठकीत तीव्र आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी नेवासा वकील संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अँड. बन्सीभाऊ सातपूते, अध्यक्ष अँड. गणेश निकम, उपाध्यक्ष अँड. सुदाम ठुबे, सचिव अँड. एजाज देशमुख, सहसचिव अँड. नीरज नांगरे, खजिनदार रविंद्र पागीरे, विश्वस्त अँड.पांडुरंग माकोणे, अँड. भागवत शिरसाठ, अँड. पंढरीनाथ अंबाडे, अँड. दिनकर घोरपडे, अँड. सोमनाथ गांगले यांच्यासह वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची शुक्रवार (दि. 8) रोजी नेवासा येथून प्रशासकीय बदली झाली आहे. पदभार सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संजय सुखधान यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदन नेवासा तालुका वकील संघाने नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिले आहे.



