google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

‘त्रिमूर्ती संकुल’ सचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रकृती चिंताजनक; नेवासा फाटा येथील खळबळजनक घटना; तर्कवितर्कांना उधाण

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांनी मंगळवार (दि. 28) रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास आपल्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून घटनेमागील कारणांबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
           प्राथमिक माहितीनुसार, घाडगे यांनी सचिव दालनाचे दोन्ही दरवाजे आतून बंद करून स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. काही वेळातच दालनातून धूर व आरडाओरड ऐकू आल्याने सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत दरवाजा तोडला. त्यावेळी ते गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळून आले.

            घटनेनंतर त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

        दरम्यान, संस्थेमध्ये गेल्या काही काळापासून प्रशासकीय निर्णय, अधिकार वाटप व व्यवस्थापनातील मतभेदांमुळे अंतर्गत तणाव निर्माण झाला होता का, याबाबत चर्चा सुरू आहे. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.

         उशिरापर्यंत या घटनेची नेवासा पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नव्हती. त्यामुळे घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, संबंधितांचे जबाब नोंदवल्यानंतरच वास्तव समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शांत व हसतमुख स्वभावासाठी ओळख असलेल्या घाडगे यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

              त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या निधनानंतर संस्थेच्या कारभारात बदल झाले होते. या पार्श्वभूमीवर सचिव मनीष घाडगे यांनी उचललेले हे पाऊल कौटुंबिक वादातून आहे का, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!