google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

नेवाशात हैप्पी ख्रिसमस!

तालुक्यात नाताळ उत्साहात साजरा; सर्व चर्चमध्ये प्रार्थनासभांचे आयोजन  

                             स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : ‘वी विश यु अ मेरी ख्रिसमस, वी विश यु अ मेरी ख्रिसमस’ या धूनवर नेवासा तालुक्यातील ख्रिश्चन धर्मियांनी नाताळ सण उत्साहात साजरा केला. इतर धर्मियांनी यावेळी ख्रिश्चन बांधवांना ‘हॅपी ख्रिसमस’च्या शुभेच्छा दिल्या. नाताळाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यातील चर्चमध्ये विश्वकल्याणाच्या प्रार्थना करण्यात आल्या. नाताळाच्या निमित्ताने सर्वच चर्चमध्ये भाविकांची गर्दी जमा झाली होती. 

              नाताळाच्या निमित्ताने नाताळ गीतांचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये परिचितांच्या घरी जाऊन नाताळाच्या शुभेच्छा देऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव केला जात होता. आज सकाळी नऊ वाजता सर्व चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्म महोत्सवाची भक्ती सुरू झाली होती. दुपारी एक वाजेपर्यंत चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनांचे आयोजन केले गेले होते. सकाळपासूनच  ख्रिस्ती भाविक चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती पेटवून प्रार्थना करत होते.


             नेवासा शहरातील गंगानगर प्रभागात असणारे ज्ञान माऊली चर्चमध्ये फादर सचिन मुन्तोडे यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रवचनात येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानव जातीच्या उद्धारासाठी असल्याचे सांगितले. ज्ञान माऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव व सहायक धर्मगुरू फादर जॉन गुलदेवकर यांनी उपस्थित भाविकांचे  स्वागत करून  प्रार्थना व मधुर गीतांद्वारे मिस्सा अर्पण केला.

         यावेळी  धर्मग्रामातील सिस्टर जोसी, सिस्टर मौली, सिस्टर लिसा, सिस्टर फ्लोरा, सिस्टर बिंदू उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये चर्च कमिटीचे सदस्य मार्कस बोर्डे, रवी पवार, राजेंद्र पवार, प्रशांत बोर्डे, विजय लोंढे, प्रा. विश्वनाथ वाघमारे, प्रा. हरीश पंडित, युवा उद्योजक अविनाश गाढवे, जळके येथील सरपंच राजेंद्र पंडित, राजेंद्र बनसोडे, सतीश खरचंद, पवन वाघमारे, वैभव मगर, विलास घोरपडे, मेजर एंजल वंजारे, उमेश इंगळे, अनिल चक्रनारायण, बाबासाहेब ठुबे, संजय वाघमारे आदी सहभागी झाले होते.

              नेवासा शहरातील बेथेल चर्च, सेव्हथ-डे चर्च, इम्मानुएल चर्चमध्ये ही पवित्र मिस्सा अर्पण करून प्रवचनाद्वारे जगाचा उद्धार व मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये कॅरल पार्टी, ख्रिस्त जन्माचे देखावे, उपासना, प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. यावेळी केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर रोजी देखील नवीन वर्षाच्या अनुषंगाने  चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!