लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’
पंतप्रधान मोदींची घोषणा, राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरा

स्वराज न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळत असल्याने मला खूप आनंद झाला आहे.
मी त्यांना याविषयी बोलून त्यांचे अभिनंदन केले आहे. अडवाणी हे एकेकाळचे सर्वात प्रतिष्ठित नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. अडवाणी हे तळागाळात काम करुन वरती आलेले आणि उपपंतप्रधान पदापर्यंत गेलेले नेते आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. संसदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि ऐकण्यासारखी असायची, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
मा. उपपंतप्रधान अडवाणी हे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. चळवळीला चालना देण्याचे श्रेय त्यांना जाते. अशा स्थितीत मोदी सरकारच्या या निर्णयाकडे आंदोलनाला दिलेली भेट म्हणून पाहिले जात आहे.