क्रिडा व मनोरंजन
नेवासा येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचा समारोप
सतरा भजनमंडळींचा सहभाग; श्रोत्यांनी घेतला सुरेल गीतांचा आस्वाद

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : येथील ज्ञानमाऊली चर्चच्या प्रांगणात नुकतीच भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाली. भजन स्पर्धेचे आयोजन ज्ञानमाऊली चर्चचे सहाय्यक धर्मगुरु फा. जॉन गुलदेवकर यांनी केले होते. यावेळी पेपल सेमिनरी पुणे येथील रेक्टर रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे एस.जे. यांनी प्रमुख पाहुणे म्हणून जबाबदारी सांभाळली.
नाशिक धर्मप्रातांचे पहिले महागुरुस्वामी स्व. बिशप थॉमस भालेराव एस. जे. यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती पंथातील भजन मंडळींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन फा. जॉन गुलदेवकर यांनी केले होते. महाराष्ट्रातील सर्व धर्मप्रांतात, धर्मग्रामामध्ये जाऊन त्यांनी भजन स्पर्धेचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार सतरा भजनमंडळीनी सहभाग नोंदवला होता.
भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पेपल सेमिनरी पुणे येथील रेक्टर रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे एस. जे. यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सी.एस.आर.डी.चे संचालक डॉ. सुरेश पठारे, ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह. फा. दिलीप जाधव, सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलच्या प्राचार्य सि. डॉ. फ्लोरा बोर्जेस, धर्मग्राम समितीचे उपाध्यक्ष मिखाएल पातारे हे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करतांना रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे यांनी भजन या शब्दाचा अर्थ फार गहन व महान आहे. ‘भज’ म्हणजे देवाला स्मरणे, देवाचे नामस्करण करणे गायनातून देवाला आपलेसे करणे. भजनाने आत्मसमाधान मिळते. हे सांगितले व यावेळी येशू ख्रिस्तावर एक भजनही गाऊन दाखविले.
डॉ. सुरेश पठारे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या युगात तरुणांपेक्षा वयोवृध्द लोकच भजनाकडे आधिक आकर्षित होत असल्याचे इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे अधिक वेळ वाया न घालवता भजनातून समाजजागृती करावी असे आवाहन केले.
भजन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.21000/ स्वर येशु भजन मंडळी, वाघोली ता. शेवगाव. द्वितीय पारितोषिक 14000/ नूतन भजन मंडळी, औरंगाबाद तृतीय पारितोषिक 7000/ सिनाई भजन मंडळी, मिरज जि. सांगली, चौथे पारितोषिक झिओन भजन मंडळी, देवलाली प्रवरा ता. राहुरीला देण्यात आले.
त्याचबरोबर उत्तम गायकाचे बक्षिस नव लोकसेवा भजन मंडळी, नेवासा फाटा, उत्तम पेटीवादकचा मान आराधना भजन मंडळ, दिग्रस ता. राहूरी, उत्तम तबला वादकाचा मान स्वर्गीय साधना भजन मंडळी, देवळाली प्रवरा, ता. राहूरी व उत्तम टाळ वादकाचा मान ख्रिस्तसुवार्था भजन मंडळी, देवगांव ता. शेवगाव यांना मिळाला. या स्पर्धेकरीता लाभलेले प्रक्षिशक रेव्ह. फा. संजय पारखे औरंगाबाद, दिलीप क्षिरसागर पुणे व सय्यद बालमभाई राहाता यांनी आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय लोंढे यांनी उत्कृष्ठरित्या केले म्हणून आयोजकांनी व उपस्थित भजनी मंडळीनी त्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आयोजक फा. जॉन गुलदेवकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्केस बोर्डे, विलास घोरपडे, उत्तम गायकवाड, संजय तुपे, मधुकर कोल्हे, प्रभधर पाटोळे, राजु पवार, सदाभाऊ सोनवने, रवि पवार, योहान मोरे, एकनाथ बोर्डे, अविनाश गाढवे, राजेंद्र पंडीत, वैभव मगर, राजु कांबळे, मचिंद्र गोरे, येशूदास शहाराव, शरद वंजारे, पप्पु कांबळे, डॅनियल कोल्हे, अक्षय बनसोडे, समाधान गायकवाड. जाधव, प्रसाद वाघमारे, राजू शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.