ब्रेकिंग
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शालिनी सुखदान
राजेंद्र काळे व डॉ. मनीषा वाघ स्वीकृत नगरसेवकपदी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. 21 डिसेंबर रोजी नेवासा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती.
या निवडणुकीत महायुतीकडून डॉ. करणसिंह घुले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. नगरसेवकांमध्ये महायुतीचे सहा, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नऊ, आम आदमी पार्टीचे एक तर एक अपक्ष नगरसेवक असा एकूण 17 नगरसेवकांचा समावेश आहे.
उपनगराध्यक्ष निवडीदरम्यान सभागृहात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. भाजप–शिवसेना युतीने अपक्ष नगरसेवक प्रवीण सरोदे यांना मतदान दिले, तर क्रांतिकारी शेतकरी पक्षने आम आदमी पार्टीच्या उमेदवार सौ. शालिनी सुखदान यांना मतदान देत पाठिंबा दिला. अखेर बहुमताच्या आधारे सौ. शालिनी सुखदान यांची निवड निश्चित झाली. त्यांना एकूण 10 मते मिळाली आणि त्यांचा 2 मतांनी विजय झाला.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून राजेंद्र काळे तर महायुतीकडून डॉ. मनीषा वाघ यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
नवनियुक्त उपनगराध्यक्ष सौ. शालिनी सुखदान यांनी विश्वास दाखविल्याबद्दल आभार मानत, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सुखदान यांच्या निवडीमुळे क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीमुळे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातील पहिला उपनगराध्यक्ष निवडून आल्याने पक्षाचे राज्यात अधिकृत खाते उघडले गेले आहे. ही निवडणूक नेवासा नगरपंचायतीच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



