
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आज बुधवार 26 जून रोजी पार पडली. अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाचा समावेश होता. या निवडणुकीत 46 हजार 503 पुरुष आणि 22 हजार 865 महिला असे एकूण 69 हजार 368 मतदार होते.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 69 हजार 368 मतदानापैकी 64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली.
नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी विभागात 93.48 % मतदान
विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी 23 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी 7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

नेवासा तालुक्यात 92.42 % मतदान
नेवासा तालुक्यात सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. नेवासा बसस्थानकासमोरील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्र होते. अनेक शाळांनी अर्धा दिवस शाळा ठेवल्याने दुपारनंतर मतदार केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसातही शिक्षक रांगेत उभे होते. नेवासा तालुक्यात शिक्षक मतदारांची संख्या 1108 एवढी होती. त्यामध्ये 856 पुरुष मतदार तर 252 स्त्री मतदार होत्या. त्यापैकी 788 पुरुष मतदारांनी तर 236 महिला मतदारांनी मतदान केले. असे एकूण 1024 मतदान झाले जे 92.42% एवढे आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.