
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासे : नेवासे तालुक्यातील मुळाथडी परिसरातील संपन्न पानेगांवात वीज वाहक तारांना बांबू कामटीचा आधार घेऊन सध्या वीज पुरवठा सुरू आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सांगण्यावरुन ६० वर्षांपासून विद्युत वाहक तारा तसेच पोल आहेत. आज रोजी पुर्णपणे तारा तसेच गावठाण हद्दीत पोल आयुष्यमान संपल्याने तारा अचानक तुटून पडतात तर काही पोल हे जमिनी लेव्हलपासून गंज धरल्याने कुठल्याही क्षणी पडू शकतात. काही ठिकाणी विद्युत प्रवाह या मध्ये उतरत असल्याने अनेक वेळा अपघात झाले आहे. विद्युत ताराही अचानक तुटून पडतात परंतु सुदैवाने हानी झालेली नाही. गावठाण हद्दीत सध्या केबल टाकल्या असून तीन महिन्यांपासून काम थांबले आहे. केबल टाकलेल्या ठिकाणी विद्युत प्रवाह करणाऱ्या तारामध्ये झोळ पडला असून कुठल्याही क्षणी तारा घासून कट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या वादळीवाऱ्यासह पावसाचे दिवस सुरू झाले असून तातडीने केबलचे काम मार्गी लावण्याची मागणी येथील वीज ग्राहक करत आहेत. तसेच गावठाण हद्दीच्या बाहेर नवीन विद्युत वाहक तारा तसेच खराब झालेले पोल टाकून द्यावे, जेणेकरून भविष्यात अपघात होणार नाही.
पानेगांव येथे विद्युत वाहक ताराऐवजी केबल टाकण्याचे काम सुरु असून संबंधित ठेकेदाराला सुचना करुन थांबलेले काम लवकरच सुरू होईल – वैभव कानडे सहायक अभियंता महावितरण नेवासा.
अर्धवट राहिलेले केबल टाकण्याचे काम पूर्ण करुन वादळी वाऱ्याने होणारे नुकसान तसेच अपघात टळतील. वीज प्रवाह खंडीत होणार नाही. यासाठी त्वरित काम महावितरण कंपनीने पुर्ण करावे- दत्तात्रय पाटील घोलप -उपसरपंच पानेगांव.