गुन्हेगारी
पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध नेवाशात सर्वपक्षीय एकजूट
पोलीस स्टेशनमध्ये केले ठिय्या आंदोलन; चोऱ्यांचा तपास लागल्यास 'बक्षीस'; नाही तर कंट्रोल रूमला बदली करण्याचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहर व परिसरात होत असलेल्या चो-याचा तपास न लागल्यामुळे आज नेवासा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेवासा पोलिसांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार तसेच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, नेवासा पोलिस स्टेशनमध्ये काही दिवसांपासून अनेक चोऱ्या झालेल्या आहेत. त्यामध्ये घरफोड्या, दरोडे तसेच दुचाकी तसेच चार चाकी वाहनांच्या चोऱ्या झालेल्या आहेत. परंतु अद्यापही त्याचा तपास लागलेला नाही. नुकतेच परभणे यांचे चारचाकी अशोक लेलंट या कंपनीचे वाहन चोरी होवुन १५ दिवस उलटुनही तपास लागलेला नाही.

नुकतीच नेवासा शहरात गोवंश तस्करी व गुटखा विक्रेते यांच्यावर नगरच्या स्थानीय गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. परंतु आपल्या निदर्शनास ही बाब आलेली नाही. त्याचे कारण असे आहे की, कोणीही अवैध धंदे होत असल्याबाबत माहिती दिल्यास सदर माहिती देणाऱ्यास अवैध धंद्यावाल्यांकडुन दमदाटी केली जाते तसेच त्या संदर्भात पोलिसांविरोधात सोशल मिडीयावर काही पोस्ट केल्यास सदर पोस्ट करणा-यांवर पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. काही पोस्ट करणाऱ्यांवर त्यापध्दतीने गुन्हाही आपण नोंदविलेला असल्याचा आरोप यावेळी निवेदनात करण्यात आला.
निवेदनात इशारा देण्यात आला आहे की चोरी झालेल्या गाड्यांचा व इतर चोऱ्यांचा तपास आठ दिवसांत करावा. जर तपास लावु शकला तर नेवासकरांच्या वतीने आपणास रक्कम रु. ११,०००/- (अक्षरी अकरा हजार रुपये) चे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. आणि जर आपण तपास नाही लावु शकला तर अकार्यक्षम अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षकांनी आपली बदली कंट्रोल रुमला करुन घ्यावी.

अन्यथा प्रजासत्ताक दिनी (दि. २६ जानेवारी) आम्ही नेवासकर या गोष्टीचा निषेध म्हणुन स्वतःचेच तोंड काळे करुन नेवासा पोलिस स्टेशनसमोर घंटानाद करणार करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आहोत. धरणे आंदोलन वेळी संजय सुखदान, गफूर बागवान, राजेंद्र मापारी, रंजन जाधव, शांताराम गायके, अजित नरुला, नंदकुमार पाटील, संतोष पंडुरे, नितीन जगताप, अरुण जाधव, अशोक ताके, मनोज पारखे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.