
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा 50 हजार 529 मतांनी पराभव केला. लोखंडे गेली 10 वर्षे खासदार होते.
शिर्डी लोकसभा मतदाता संघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या चार या सहा तालुक्यांचा समावेश होतो. भाऊसाहेब वाकचौरे यांना 476900, सदाशिव लोखंडे यांना 426371 व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना 90929 मते मिळाली.
नेवासा विधानसभा मतदारसंघात वाकचौरे यांना 73445, लोखंडे यांना 76573, रुपवते यांना 12306 मते मिळाली. नेवासा विधानसभा मतदारसंघात लोखंडे यांना 3128 मताधिक्य मिळाले आहे.
शिर्डी मतदार संघात 1057328 मते तर पोस्टल मते 3090 इतकी होती. ज्यामध्ये 2536 वैध मते होती. तर 554 अवैध मते होती. एकूण 1060418 मतदान झाले. या मतदार संघात 20 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.
शिर्डीत अनुसूचित जाती राखीव जागेसाठी 2009 मध्ये पहिली निवडणूक झाली होती. ज्यामध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचोरे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये वाकचोरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यावर शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत वाकचौरे यांचा 199922 मतांनी पराभव झाला.
यानंतर 2019 च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांना संधी देण्यात आली. पण शिर्डी लोकसभा मतदार संघाने पुन्हा सदाशिव लोखंडे यांच्यावर विश्वास ठेवला. आता 2024 मध्ये वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव करून हिशोब चुकता केला आहे.