ब्रेकिंग
नेवासा नगरपंचायत निवडणूक लांबणीवर ..?
दृष्टिक्षेपातील निवडणूक झाली दृष्टीआड; निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होणार ? 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा – नगर पंचायतीची रणधुमाळीमध्ये शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांचा प्रचार शिंगेला पोहोचला असतानाच निवडणुक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम बनवला आहे. निवडणूक आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या निर्णयाने नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार व नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
ज्या निवडणुकांमध्ये न्यायालयीन वाद झालेले आहेत व या वादांचे निकाल २३ तारखेनंतर लागलेल्या सर्व ठिकाणांचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्याचा धक्कादायक निर्णय आयोगाने घेतला आहे.
नियमानुसार पूर्ण झालेल्या टप्प्यांपासून पुढील टप्प्यांसाठी संबंधित नगरपरिषद / नगरपंचायतीच्या निवडणुकीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
-: आदेश:-
१. जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि.२२/११/२०२५ नंतर म्हणजेच दि.२३/११/२०२५ किंवा तद्नंतर देण्यात आलेला आहे अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका दि.०४/११/२०२५ रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
२. परिच्छेद क्र. १ नुसार केलेल्या कार्यवाही अंती ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यांच्या जागेच्या अथवा अध्यक्ष पदामुळे संपूर्ण नगरपरिषद / नगरपंचायतींच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत, अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या जागांची व अध्यक्ष पदाबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी संकलित करावी व अशा नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या व यथास्थिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ मध्ये दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार सुधारित सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा.
३. जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या जागेच्या अथवा अध्यक्ष पदासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक जाहीर करण्यात येणार आहे त्याची तयार केलेली यादी (परिच्छेद-२ नुसार) सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मधील प्रमाणपत्रासह राज्य निवडणूक आयोगास विनाविलंब सादर करावी.
नेवासा शहरातील नगराध्यक्ष पदासह चार प्रभागांतील निवडणुका न्यायालयात प्रलंबित होत्या. हे सर्व अपिले न्यायालयाने फेटाळली परंतु हे निकाल २३ तारखेनंतर लागल्याने नेवासा नगरपंचायत ही थेट या निर्णयाच्या कक्षेत आली आहे. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. आता मतदान 20 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.








