google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

"सौर ऊर्जा पंप लावून देतो" म्हणत केली फसवणूक; नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

                                          स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : सौर ऊर्जा पंप लावून देतो म्हणून शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्याच्या नेवासा पोलिसांनी मुसक्या आवळून त्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीवर नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.
              याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकिकत अशी की, शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कॉल करून मी संदीप बोडके बोलत असून तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो, अशी बतावणी करून अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना फसवणाऱ्यास  पोलिसांनी शिताफीने अटक केली.
         सविस्तर वृत्त असे की, प्रकाश पांडुरंग ढोकणे रा. गोपाळपूर ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना दिनांक 18 एप्रिल रोजी संदीप बोडके नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर कॉल केला व तुम्ही सौर पंप मिळणे करिता अर्ज केला आहे. तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही माझ्या फोन-पेवर अनामत रक्कम पाठवा. तुमचे पैसे आज पोहोच झाल्यावर उद्याच तुमचा सौर पंप बसवण्याचे काम करतो. सुरुवातीस फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु नंतर अनेकदा फोन करून इन्शुरन्सचे 3400/- रुपये फोन पे करा असे म्हणाला. त्यावर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांनी संदीप बोडके यास फोन-पेवर सौर पंपाच्या इन्शुरन्सचे 3400 पाठवले. परंतु नंतर संदीप बोडके याने फोन घेण्याचे बंद केले. त्यानंतर फिर्यादी प्रकाश ढोकणे यांना संशय आला व त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसेच अधिक माहिती घेतली असता त्यांच्या ओळखीचे संदीप गव्हाणे रा. म्हसले, बाबा घुले रा. तरवडी व शरद गायकवाड रा. वाकडी यांची देखील फसवणूक झाल्याचे समजले. 
            झालेल्या फसवणुकीबाबत प्रकाश ढोकणे यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे तक्रार दिल्याने संदीप दिलीप बोडके रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान अशाच प्रकारची फसवणूक राहुरी तालुक्यातही झाली असल्याने पोलीस ठाणे राहुरी येथे देखील संदीप बोडके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. संदीप बोडके यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर व राहुरी पोलिसांनी जायबंद केले आहे. संदीप बोडकेवर यापूर्वी दरोड्याची तयारीसारखे गंभीर गुन्हे पोलीस ठाणे नेवासा येथे नोंद आहे. 
              ज्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारची फसवणूक झाली असेल त्यांनी त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा स्टेशनचे पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!