
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : घसरुन रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकलवरुन कार गेल्याने मोटरसायकलवरील दोघे चिरडून मृत्यूमुखी पडल्याची व एकजण जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव फाट्याजवळ घडली. मृत पावलेले दोघेही पुनतगाव येथील रहिवासी होते. सदर घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर हकिकत अशी की, शनिवार (दि. 5) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास इसम नामे विक्रम भीमा आढाव राहणार शिरजगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव तालुका नेवासा येथे स्वतः करिता सेकंड हँड कार पाहण्यासाठी श्रीरामपूरकडून नेवासाकडे येत असताना पुनतगाव फाट्याच्याजवळ नेवासाकडून एका मोटरसायकलवर तिघेजण येत असताना मोटरसायकल घसरून पडल्याने ती कारखाली आली आल्याने दोघे जण कारखाली रगडले गेले व पाठीमागे बसलेला तिसरा इसम बाजूला फेकला गेला. कार चालकाने कार थांबून पाहिले असता दोघेजण गंभीर जखमी झालेले होते.
कार चालक विक्रम आढाव हा आपले दोन्ही मित्रांसह रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला हात करून नेवासा पोलीस ठाण्यात आला व पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार यांना तातडीने घटनास्थळी पाठवले तसेच मृतक व जखमी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे भरती केले. परंतु मोटर सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत झालेल्या दोघांची नावे अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे वय 32 वर्ष व निवृत्ती ज्ञानेश्वर पवार वय 56 वर्ष (दोघे राहणार पुनतगाव तालुका नेवासा) असून मोटर सायकलवर बसलेला तिसरा व्यक्ती सुभाष भाऊराव सोनवणे वय 65 वर्ष राहणार पुनतगाव, तालुका नेवासा उपचारासाठी आत्मदीप हॉस्पिटल नेवासा फाटा येथे उपचार घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले.
या घटनेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे अकस्मात मयत दाखल झाला असून मोटर सायकलवरील दोन्ही मृतकांचा इंक्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टम कारवाई नेवासा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी पार पाडली. सदरचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.
दरम्यान मृत्यू झालेल्या दोघांवर सायंकाळी पुनतगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्ती पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ व वडील असा परिवार आहे तर अमोल उर्फ शिवाजी दारकुंडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगी व दोन मुले आहे. या अपघातामुळे पुनतगाव परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.



