
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे दिनांक २ ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत २० वा हप्ता हस्तांतरण कार्यक्रमाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. क्षितिज घुले पाटील, मा. सभापती पंचायत समिती शेवगाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेला साडेसहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याअंतर्गत २० व्या हप्त्याचे थेट नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्याच्या खात्यात रु २०५०० करोड रक्कमचे हस्तांतरण माननीय प्रंतप्रधान मोदी यांचे हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश येथून करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन देखील करण्यात आले. माननीय प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन प्रधानमंत्री धन्य कृषी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा व्यक्त केली.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीएम फसल बीमा योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी लखपती दीदी ही महत्त्वाची योजना असल्याचे देखील माननीय प्रधानमंत्री यांनी नमूद केले. के व्ही के दहिगाव ने येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, शेतीमध्ये ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा व आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले तर श्री महादेव लोंढे, तालुका कृषी अधिकारी पाथर्डी व श्री अंकुश जोगदंड, तालुका कृषी अधिकारी शेवगाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पिकावर व फळबागेवर केव्हीके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे व नंदकिशोर दहातोंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमास दहिगाव ने चे सरपंच श्री राजाभाऊ पाऊलबुद्धे, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब मरकड, प्रशासकीय अधिकारी श्री कारभारी नजन सर, पत्रकार मच्छिंद्र पानकर, मडके, मंडल कृषि अधिकारी श्री प्रशांत टेकाळे, श्रीमती व्ही आर घुले, श्री तात्यासाहेब दिवटे, श्री नंदकिशोर थोरे श्री अतुलकुमार बनकर, तसेच केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी व कार्यक्षेत्रामधील २०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी तर आभार इंजि. राहुल एस. पाटील यांनी मानले



