google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दोन चिमुरड्यांसह पाच जणांचा गुदमरून मृत्यू

फर्निचर दुकानाला मध्यरात्री आग; झोपेतच संपूर्ण रासने कुटुंबाचा अंत; नेवासा येथील दुःखद घटना 

                                     स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. नेवासा ते नेवासा फाटा रोडवरील कालिका फर्निचर या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागून धुराचे लोळ दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घरात गेल्याने घरात झोपलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचा या घटनेत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून करून अंत झाला. रात्री अंदाजे एकच्या सुमारास ही घटना घडली असून, आगीचा भडका इतका तीव्र होता की, कुटुंबीयांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याची संधीदेखील मिळाली नाही.

                                       मयूर व पायल रासने

           मिळालेल्या माहितीनुसार, दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या मयूर अरुण रासने (३६) यांचे कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात मयूर यांच्यासह त्यांची पत्नी पायल (३०), दोन लहान मुले अंश (११) व चैतन्य (५) आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) यांचा जागीच मृत्यू झाला. रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते. मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर घरभर पसरला आणि गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्धी येण्यापूर्वीच मृत्यूने कवेत घेतले. आई-वडील, दोन चिमुरडी मुले आणि वृद्ध आई अशा पाच जीवांचा एकाच वेळी घेतलेला बळी पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर यश किरण रासने वय २५ याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई दोघे नातेवाईकांकडे मालेगाव येथे गेले असल्याने ते बचावले.

                                  अंश रासने

          आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, व इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. स्थानिकांनी आरडाओरड करून बचावकार्य सुरू करण्याचा प्रयत्न केला; अग्निशमन दलही घटनास्थळी धावले. तथापि, आगीचा वेग इतका जबरदस्त होता की, आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही.

                                 चैतन्य रासने

           या घटनेनंतर नेवासा फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. रासने कुटुंब हे परिसरातील सर्वपरिचित व कष्टाळू म्हणून ओळखले जात होते. दोन निरागस मुलांचा, त्यांच्या आई,वडिलांचा आणि आजीचा असा अकाली अंत झाल्याने स्थानिक नागरिक व्यथित झाले आहेत. “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा प्रकारची वेळ कोणावरही येऊ नये,” अशी प्रतिक्रिया शेजारील दुकानदारांनी दिली.

                                 सिंधुताई रासने

       पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सखोल तपास सुरू केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने संपूर्ण नेवासा परिसर शोकसागरात बुडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे कुटुंबाला श्रद्धांजली अर्पण केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!