
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयितास अटक केली आहे. अविनाश द्वारकानाथ सावंत (रा. देवसडे, ता. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संबंधित इसम गावठी कट्टा (पिस्तूल) घेऊन कुकाणा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब वैद्य, हरिभाऊ धायतडक व अमोल डमाळे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. संशयितास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिभाऊ धायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ४०३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शहाजी आंधळे हे करीत आहेत.



