ब्रेकिंग
ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
माऊलींच्या कर्मभूमीत रंगला पहिला रिंगण सोहळा; आळंदीच्या धर्तीवर भव्य पालखी रथ

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या पावन तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. बुधवार (दि. ८) रोजी दुपारी ठीक चार वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषात हा सोहळा मार्गस्थ झाला. माऊलींच्या पदस्पर्शाने आणि भक्तांच्या उत्साहाने संपूर्ण नेवासे नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली.
नेवासे बसस्थानकावर रंगला ‘पहिला रिंगण सोहळा’
पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला पहिला रिंगण सोहळा नेवासे बसस्थानक प्रांगणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. वारकरी, टाळकरी आणि दिंडीतील देखण्या अश्वाने या रिंगणात घेतलेली धाव पाहण्यासाठी नेवासे शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. “माऊली माऊली”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
आळंदीच्या धर्तीवर भव्य पालखी रथ
संत ज्ञानेश्वर महाराज “पैस” खांब मंदिराचे निर्माते वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने आणि वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा आळंदीच्या धर्तीवर बनवलेला माऊलींचा भव्य पालखी रथ नेवासकरांसाठी खास आकर्षण ठरला.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून पालखी दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांची सलामी दिली गेली. सुवासिनींनी चौकाचौकात अंगणात सडा-रांगोळी काढून, पंचारती ओवाळून माऊलींचे स्वागत केले. शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात विविध संस्था व संघटनांच्या वतीने भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.
संत-महंत आणि मान्यवरांची उपस्थिती
प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचा मुख्य अभिषेक सोहळा पार पडला. यावेळी देवगड संस्थानचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हभप उद्धवजी महाराज मंडलिक, आणि रमेशानंदगिरीजी महाराज यांच्यासह अनेक साधू-संत उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, रत्नमालाताई लंघे-पाटील, उदयन गडाख, प्रभाकर शिंदे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. अविनाश काळे, नंदकुमार पाटील, शंकरराव लोखंडे, लक्ष्मीनारायण जोंधळे महाराज, उपनगराध्यक्षा शालिनीताई सुखधान, संजय सुखधान, संभाजी धोत्रे, स्वप्निल मापारी, जितेंद्र कुऱ्हे, मुक्तारभाई शेख, अनिल शिंदे, दिनेश व्यवहारे, असिफ पठाण आदी मान्यवरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
ज्ञानेश्वर महाविद्यालयात पहिला मुक्काम आणि महाप्रसाद
रिंगण सोहळ्यानंतर ही पालखी दिंडी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे नेवासे फाटा रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे पहिल्या मुक्कामासाठी पोहोचली. या ठिकाणी नेवासा खुर्द व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची पहिली पंगत देण्यात आली.
‘सर्वात मोठी दिंडी’ असण्याचा अंदाज; शासकीय सुविधांचे कौतुक
पंढरपूरच्या वाटेवर या दिंडीत पुढे असंख्य लहान-मोठ्या दिंड्या सामील होणार असल्याने, ही या मार्गावरील सर्वात मोठी दिंडी ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच या दिंडीला शासकीय सुविधा आणि चोख पोलीस बंदोबस्त मिळाला असल्याने नेवासकरांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले आहे.



