दीड टन प्रतिबंधित मांगूर मासे पकडले
नेवासा पोलिसांची कारवाई; 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नेवासा : शासनाने प्रतिबंधित केलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप जीप नेवासा पोलिसांनी गिडेगाव शिवारातून जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोकॉ रामचंद्र वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 03 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याचे सुमारास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक माने असे आम्ही गोंडेगाव तालुका नेवासा भागात पेट्रोलिंग करत असतात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पिकअप जीप (एमएच 17 एजे 6575) या वाहनात दोन इसम प्रतिबंधित मांगुर मासे भरून ते सुरेगाव दही या गावाकडून गोंडेगाव मार्गे नेवासा गावाच्या दिशेने जात आहेत. अशी माहिती मिळाल्याने आम्ही गोंडेगावकडे येणारे रोडवर थांबलो असता सायंकाळी 4:15 च्या सुमारास बातमीतील नमूद जीप समोरून आली. तिला थांबवले असता समोरील बाजूस दोन इसम बसलेले होते. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपले नाव अमोल सुदाम म्हस्के (वय 28) रा. गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय 21) रा. गारखेडा ता. जामनेर जिल्हा जळगाव असे सांगितले. आरोपींना मासे कुठे घेवून जात आहात ? असे विचारले असता त्यांनी भिगवन ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे विक्री करण्यासाठी घेवून जात आहोत असे सांगितले.