ब्रेकिंग
नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; १० ते १२ जण जखमी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा पिंपरी शहाली, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांची सहल आज गुरुवार (दि 12) सकाळी मोठ्या अपघातातून बचावली. खामुंडी (ओतूर, ता. जुन्नर) येथे सहलीसाठी जात असताना 53 विद्यार्थ्यांनी प्रवास करत असलेल्या बसचा ओतूर टोल नाक्यापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर असलेल्या आळेफाटा येथे टायर फुटून बस पलटी झाली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदर लालपरी (MH 14 LX 6747) बस 53 विद्यार्थ्यांना घेऊन रात्री दीड ते दोनच्या दरम्यान पिंप्री शहाली येथून निघाली होती. तिचा सकाळी 6 : 45 च्या दरम्यान हा अपघात झाला. सदर बस टायर फुटून उजव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात सुमारे १० ते १२ विद्यार्थी आणि काही शिक्षक किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखी कोणतीही गंभीर बाब नाही.
उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसची व्यवस्था करून सुरक्षितपणे घरी रवाना करण्यात येत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
आळेफाटा परिसरातील शिक्षकवृंद बाबुराव कदम, मच्छिंद्र दळवी तसेच स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी पाणी, बिस्किटे आणि नाश्त्याची व्यवस्था केली. डॉक्टरांशी चर्चा करून सर्व आवश्यक वैद्यकीय काळजी घेतली जात आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली होती. मात्र प्रशासन आणि शिक्षकांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये, अशी विनंती संबंधितांकडून करण्यात आली आहे. ही घटना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासादरम्यान अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित करते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटनांमधून प्रशासनाने धडा घेणे आवश्यक आहे.



