कृषीवार्ता
तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या
'जनसंसद'चे नेवासा तहसीलदार यांना निवेदन; विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांचे झालेले नुकसान तातडीने पंचनामे करून भरपाई वेळेत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनसंसद नेवासा तालुका समितीने नेवासा तहसीलदार यांना दिले.
दिलेल्या निवेदनात भारतीय जनसंसदने म्हटले आहे की, चालू आठवड्यात दि. 7 रोजी वादळी वारा व मुसळधार पावसामुळे काढणीस आलेले गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा व फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. याची पाहणी करून नुकसान भरपाई मागील वर्षी अवकाळी पावसामुळे जे पंचनामे झाले होते त्याचे पैसे महाराष्ट्र शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत तसेच पंतप्रधान विमा योजनेप्रमाणे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक विमा उतरवलेल्या नुकसानीचे अजूनही पैसे मिळाले नसल्याने संबंधित विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे शासनाने दाखल करावे.
नेवासा अण्णा हजारे प्रणित भारतीय जनसंसद भ्रष्टाचार विरोधी नेवासा शाखा यांच्या वतीने नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष रामराव पाटील भदगले, एस आर शिंदे, कृषी तज्ञ डॉ अशोकराव ढगे, उपाध्यक्ष कारभारी गरड, डॉक्टर करणसिंह घुले, सचिन दाते, विनोद पटेकर रंगनाथ डुकरे, आकाश घुटे यांनी निवेदन सादर केले.



