आरोग्य व शिक्षण
नगर येथे स्त्रीशक्ती समाधान शिबीर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर; 12 मे रोजी होणार आयोजन
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणीची शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन 12 मे रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजमाता जिजाऊ सभागृह महानगरपालिका, अहमदनगर येथे केले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांच्या समन्वयाने शहरी भागाकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदनगर महानगरपालीका आयुक्त डॉ. पंकज जावळे उपस्थित राहणार आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी पुर्व आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात महिलांच्या समस्यांचे निवारण करणेसाठी जास्तीत जास्त महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन या शिबीर कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी अहमदनगर शहर सुधीर पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.