google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

लाखो भाविकांनी घेतले ’पैस’ खांबाचे दर्शन

’ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली; कामिका वद्य एकादशी यात्रा उत्साहात

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशी  यात्रेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.यावेळी “पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. शेकडो दिंड्यांनी यावेळी माऊलीचा गजर करत हजेरी लावली.
   
             कामिका एकादशीच्या निमित्ताने गुरूवारी दि. 13 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख व जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलराव अभंग व सौ. लताताई अभंग, योगेश रासने व सौ. रुपाली रासने, वसंत रासने व सौ. सविता रासने यांच्या हस्ते माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबास वेदमंत्राच्या जयघोषात सपत्नीक अभिषेक घालण्यात आला.
         
           संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा कामिका एकादशीला भरत असल्याने श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक, इमामपूर येथील जंगली महाराज मेरुदंड आश्रमाचे प्रमुख महंत बाळकृष्ण महाराज, आ. शंकरराव गडाख, मा. आ. संभाजीराव फाटके, मा. आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे यांनी माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले. या सर्वांचे स्वागत देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख व संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी स्वागत केले.
   
            कामिका एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. तर मंदिर प्रांगणात आ. शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने तसेच पंचगंगा सिड्स कंपनीच्या वतीने बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, प्रभाकर शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.
      
          नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ. संजय बिरादार व पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या अधिपत्याखाली होमगार्ड जवानांनी ‘निष्काम सेवा’ दिली. फळ विक्रेते यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने भाविकांना रस्त्यावरुन जाण्यासाठी सुकर मार्ग तयार करण्यात आला होता. नेवासा शहरातील एस टी स्टँड, मराठी शाळा, मार्केट कमिटीच्या प्रांगणात वाहन पार्किंग करण्यात आली होती. चारचाकी वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय प्रांगणात व्यवस्था करण्यात आली होती.
    
           कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरासह मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती.  नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातील शेकडो दिंड्यांनी येथे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत हजेरी लावली. यावेळी आलेल्या सर्व वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत करून श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!