आरोग्य व शिक्षण
महात्मा गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती संकुल येथे प्रदर्शन. महात्मा गांधी जीवनदर्शनावर आधारित दूर्मिळ छायाचित्रे
स्वराज न्यूज नेटवर्क नेवासा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त, ‘मोहनदास ते महात्मा’, महात्मा गांधी जीवनदर्शनावर अधारित दूर्मिळ छायाचित्रांच्या मल्टिमिडीया प्रदर्शनाचे आयोजन त्रिमूर्ती शैक्षणिक संकूल, त्रिमूर्तीनगर येथे दिनांक 2 व 3 ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसांकरिता सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत करण्यात आले आहे.
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन अहमदनगर येथील केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, केंद्रीय संचार ब्यूरो व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाण. त्रिमूर्तीनगर, तालूका नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेता ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना एकत्र केले. अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंग्लंडला गेले पण नंतर ते मायदेशी परतले. नंतर दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला आणि स्थलांतरितांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सत्याग्रह केला. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. यात सत्याग्रह आणि खिलाफत चळवळ, मीठ सत्याग्रह, दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन इत्यादींचा समावेश आहे. गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अहिंसेचे तत्व अंगीकारले. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडीत माहिती संक्षिप्त व छायाचित्र स्वरूपात प्रदर्शित करण्यात येत आहे.
या प्रदर्शनानिमित्त दोन दिवसांकरिता देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये त्रिमूर्ती शैक्षणिक संकूलातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा मुळ उद्देश हा विद्यार्थी आणि नविन पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र व कार्य याची इत्यंभूत माहिती व्हावी यासाठी संक्षिप्त आणि छायाचित्र, व चित्रफितींच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी तहसिलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्राचार्य सचिन कर्डिले, प्राचार्य सोपान काळे, प्राचार्य जितेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र कात्रस, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी पी. कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खूले राहणार असून या प्रदर्शास नागरिक व विद्यार्थ्यांनी भेटी द्याव्यात असे आवाहन केंद्र सरकाच्या वतीने करण्यात आले आहे.