ब्रेकिंग
नेवाशातील 339 लाभार्थींना 34 लाखांचे कर्ज
रस्त्यावरील व्यवसायिकांसाठी कर्जाची सुविधा; प्रस्ताव सादर करण्याचे नगरपंचायतचे आवाहन
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगरपंचायत मध्ये दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ही योजना सुरू झालेली असून या योजनेच्या माध्यमातून पी.एम.स्वनिधी अंतर्गत शहरातील ३३९ लाभार्थींना रुपये दहा हजार प्रमाणे एकूण ३३,९०,०००/-(तेहेतीस लाख नव्वद हजार रु) कर्ज वितरीत झाले आहे. अद्यापही ज्या लाभार्थींनी पी.एम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी केले आहे.
नेवासा नगरपंचायतअंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करत असलेल्या म्हणजेच फेरीवाल्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून अल्प व्याजदरात कर्ज मिळत असून ते फेडल्यानंतर रुपये वीस हजार, रुपये पन्नास हजारापर्यंत कर्ज मिळत आहे.
आतापर्यंत नेवासा शहरातील ६०१ लाभार्थींनी ऑनलाइन कर्ज प्रस्ताव सादर केलेले असून त्यापैकी ३८५ लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. या मंजूर झालेल्या कर्जापैकी ३३९ व्यक्तींना प्रत्यक्ष कर्जाचा लाभ झालेला आहे. नियमित परत फेड करणा-या २७ लाभार्थीना रु २०,०००/- कर्ज मिळाले आहे. केंद्र शासनाची ही अत्यंत महत्त्वाची योजना असून छोट्या व्यावसायिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी या योजनेचा उपयोग होत आहे.
नेवासा शहरातील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या ज्या नागरिकांनी पी.एम स्वनिधी अंतर्गत कर्ज घेण्यासाठी अजूनही प्रस्ताव सादर केलेले नसतील, त्यांनी सुविधा केंद्रात (सीएससी सेंटर/ सेतू केंद्र) मध्ये जाऊन पी.एम स्वनिधी अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावेत. यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, करत असलेल्या व्यवसायाचा फोटो, नेवासा नगरपंचायतची बाजार पावती इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी नेवासा शहरातील जास्तीत जास्त लाभार्थींनी पी.एम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अंबादास गर्कळ व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले आहे.