ब्रेकिंग
देवळालीत सैनिक पत्नीचे नगराध्यक्ष दालनासमोर धरणे आंदोलन..!
नगराध्यक्ष कदम यांच्यावर मानसिक छळाचा आरोप; नगराध्यक्ष दालनाला कुलूप लावून गायब?

स्वराज न्यूज नेटवर्क
देवळाली प्रवरा : भारतीय सैन्य दलात रुजू असलेले लान्स नाईक दीपक वसंतराव कदम यांची पत्नी पूनम कदम यांनी त्यांच्या कुटुंबातील आधार कार्डवरील पत्ता बदल करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांवर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेण्यासाठी ६ मार्च रोजी त्यांच्या परिवारातील सहा जणांची कागदपत्रे नगर परिषदेचे शिपाई भोंडगे यांचे मार्फत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे समक्ष दिली होती. परंतु त्यांनी त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी न करता ती सर्व कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेतली. व पूनम कदम यांना दुसऱ्या दिवशी येऊन कागदपत्रे घेऊन जाण्यास सांगितले. तथापि, दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे कागदपत्रे घेण्यास गेल्या असता नगराध्यक्षांनी पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. असे नगराध्यक्षांनी पूनम कदम यांच्यासोबत वारंवार केले. कागदपत्रे उद्या देतो. या बहाण्याने पूनम कदम यांना नगरपरिषदेमध्ये दररोज तासनतास नगराध्यक्षांनी बसवून ठेवून त्यांचा मानसिक छळ केल्याबद्दल पुनम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी देवळाली प्रवरा, आदींना निवेदन देऊन तात्काळ कागदपत्रे देण्यास कळविले होते. कागदपत्रे मिळाले नाही तर २४ मार्च रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या दालनामध्ये बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आज पूनम कदम यांनी ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षांच्या दालनात आंदोलन करण्यासाठी नगरपरिषदेत आल्या असता नगराध्यक्षांचे दालनास कुलूप असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या सोबत पूनम कदम यांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर जवळपास तीन तास ठिय्या दिला. नगराध्यक्ष नगरपरिषदेकडे फिरकले नसल्याने त्यांनीच माझे कागदपत्रे ठेवून घेतले आहेत हे सिद्ध होत असल्याचे पुनम कदम यांनी सांगितले. एकीकडे नगराध्यक्ष नगरपालिकेतील झेंडावंदन माजी सैनिकांच्या हस्ते करत असताना दुसरीकडे मात्र सैनिकाच्या पत्नीचा ते मानसिक छळ करीत असल्याने सैनिकांप्रती असलेले त्यांचे बेगडी प्रेम समोर आल्याची भावना झाली आहे. मला जर चार दिवसात कागदपत्रे मिळाले नाही तर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

यावेळी तक्रारदार सैनिक पत्नी पूनम कदम यांचे समवेत नगरसेविका सुनीता थोरात, पल्लवी ढूस, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, संतोष चोळके, डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरूण ढूस, आर पी आय जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार महिला शहर प्रमुख भाग्यश्री कदम, हिराबाई कदम, स्नेहल दिवे, प्रमोद कदम, अनिल चव्हाण, वसंत कदम, दादा गिरमे, गोरख सांबारे, मनीष देठे, भगवान गडाख, ललित चोरडिया, कुणाल पाटील, शुभम पाटील, नाना उंडे, कानडे आदी उपस्थित होते.



