ब्रेकिंग
नेवासा येथे शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या
ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी; भानसहिवरे येथील घटना

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील भानसहिवरा येथील बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलचे बाथरूममध्ये काल (दि. 24) दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नेवासा पोलीस पुढील तपास करत आहेत.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारा इयत्ता सहावीमधील विद्यार्थी सार्थक विक्रम कोकरे, वय 12 वर्षे राहणार पाचुंदा, तालुका नेवासा या बालकाने हॉस्टेलचे बाथरूममध्ये काल दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर मुलगा संस्थेच्या जय मल्हार हाऊस या होस्टेलमध्ये राहत होता.
ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकलचे विद्यार्थी सूरज भणगे व हर्षल शिंदे हे ग्राउंडवर जेवण करीत असताना तेथे दोन लहान मुले येऊन एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये फाशी घेतली आहे असे सांगून रडू लागली. या विद्यार्थ्यांनी बाथरूममध्ये जाऊन पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत सदर मुलगा दिसून आला त्यांनी या मुलास गळफासातून खाली सोडविले.
बालकाला शाळेतून ऍम्ब्युलन्सने नेवासा फाटा येथील प्रथमतः आत्मदीप हॉस्पिटल व नंतर ग्रामीण रुग्णालय येथे दवाखान्यात शाळेचे शिक्षक काकासाहेब वाल्हेकर व अमोल विघे हे घेऊन गेले. ग्रामीण रुग्णालय नेवासा या ठिकाणी बालकांचे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यूचे कारण गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी विद्यालयाचे व होस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे पाहणी केली असता प्रथमदर्शनी काहीही आक्षेपार्ह दिसून आलेले नाही. तसेच विद्यार्थी राहत असलेले ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह नोट मिळून आली नाही.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी भेट दिली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 194 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.



