आरोग्य व शिक्षण
आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरू
7,056 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार; ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन

स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शैक्षणिक सत्र 24 -25 या वर्षातील प्रवेश प्रक्रिया दिनांक 3 जूनपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस डी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रवेशाबाबतची जाहिरात संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यात एकूण 16 शासकीय व 29 अशासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अनुक्रमे 2752 व 4304 अशा एकूण 7056 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
प्रवेशासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व काही अभ्यासक्रमांमधून इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक 3 जून ते 30 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. प्रवेश अर्जाची निश्चिती नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उमेदवारांना करता येईल.
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी उपलब्ध ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन प्रवेशाबाबत उपलब्ध माहिती पुस्तिका डाऊनलोड करून आपला अर्ज अचूक भरावा व प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांनी घ्यावी व याबाबत काही अडचण असल्यास आपल्या नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट द्यावी व प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घेऊनच आपला अर्ज निश्चित करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.