ब्रेकिंग
नेवासा शहरातील 14 दुकाने आगीत भस्मसात
नगरपंचायत चौकातील दुकानांना रात्रीच्या सुमारास आग; 47 लाख 70 हजारांचे नुकसान

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात पोस्ट ऑफिस व मुख्य रस्त्यावर असलेल्या एकूण चौदा दुकानांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने ४७ लाख ७० हजाराचे नुकसान झाले. आगीचे कारण एका दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे झाले असल्याचे समजते. या लागलेल्या आगीत सर्व दुकानातील साहित्य जळून भस्मसात झाले.

नगरपंचायत चौकातील पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या व चौकातील डाव्या साईडला असलेल्या सुमारे सात ते आठ दुकानांना रात्री १.३० च्या सुमारास आग लागल्याचे समजताच काही नागरिकांनी भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला या घटनेची खबर दिली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात येइपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
अचानक लागलेल्या या आगीत साळुंके यांचे पेंड दुकान, शेजुळ यांचे केशकर्तनालय, लक्ष्मण रासने यांचे आशा जनरल स्टोअर्स, गणेश व्यवहारे यांचे प्रताप पुष्पालय, जालिंदर शेंडे यांचे चप्पल दुकान, सिंगार दुकान, तंटक यांचे बांगडी दुकान, अशोक शेजुळ यांचे केश कर्तनालय, सय्यद यांचे खारी केक शॉप, शिवशक्ती आईस्क्रीम सेंटर, बोरुडे यांचे केशकर्तनालय या दुकानाचा समावेश आहे.

याबाबत सर्व जळीत दुकानदारांच्या वतीने पशु खाद्य दुकान चालक प्रकाश सदाशिव साळुंके यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी नुसार जळीत झालेल्या १४ दुकानदारांच्या प्रत्येकाच्या केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण ४७ लाख ७० हजाराचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
जळीत झालेल्या व्यापाऱ्यांचे नुकसान पुढीलप्रमाणे:- प्रकाश सदाशिव साळुंके यांच्या पोस्ट ऑफीसशेजारी असलेल्या ज्ञानेश्वर ट्रेंडींग कंपनी या दुकानाचे पंचवीस लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले यामध्ये सरकी पेंड, भुसा, काठी पेड, मकाचुणी व दुकानातील फर्निचर साहित्य जळून खाक झाले. राम अरविंद शेजुळ यांच्या शिवशक्ती आईसक्रिम नावाचे दुकानाचे आईसक्रिम व आईसक्रीमचे साहित्य सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. सचिन अशोक बोरुडे यांच्या प्रभात हेअर ड्रेसर्स दुकानातील दीड लाखाचे नुकसान झाले. रिजवान सादिक सय्यद यांचे स्टार केक शॉपचे ७ लाखाचे नुकसान झाले,
महेश अशोक शेजुळ यांचे लकी मेन्स पार्लरचे पन्नास हजाराचे, विनायक शंकर तंटक यांच्या लक्ष्मी अलंकारचे एक लाखाचे, अफरोज पठाण यांच्या शृंगार दुकानाचे एक लाखाचे, जालिंदर शेंडे यांच्या चप्पल दुकानाचे दोन लाख, गणेश व्यवहारे यांच्या फुल दुकान व साहित्य फर्निचर मिळून पन्नास हजाराचे, लक्ष्मण निवृत्ती रासने यांच्या आशा जनरल या दुकानाचे पाच लाखाचे, नरहरी रघुनाथ शेजुळ यांच्या नम्रता सलूनचे पन्नास हजाराचे, जावेद शेख यांच्या मोबाईल शॉपीचे एक लाखाचे, सुनील बोरुडे यांच्या सलूनचे पन्नास हजाराचे, राजेंद्र चांदणे यांच्या मोबाईल शॉपीचे वीस हजार असे एकूण ४७ लाख ७० हजाराचे नुकसान झाल्याची नोंद नेवासा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे हे करत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानांना आग लागली ती एका दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची चर्चा होती. पहाटे पासून दुकानांना लागलेली आग पहाण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी होती. यावेळी लोक हळहळ व्यक्त करताना दिसत होते.
????????????????????????????????????
*https://youtu.be/CPcjBU4Xib8?si=jJZw1_6hlcsqZlxr*
*https://youtu.be/CPcjBU4Xib8?si=jJZw1_6hlcsqZlxr*