आरोग्य व शिक्षण
सरकारचा चाळीस वर्षापासूनच्या लाडक्या बहिणीला ठेंगा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाही मिळाली मानधन वाढ; एक ऑक्टोबरपासून वाढणार होते मानधन; अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : राज्य मंत्रिमंडळाच्या मागील महिन्यात (दि. 4 ऑक्टोबर) बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा होऊन शासन निर्णयही काढण्यात आला होता. एक ऑक्टोबरपासून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनात वाढ व प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु यापैकी काहीच पदरात न पडल्याने राज्यातील तमाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
अंगणवाडी सेविकेच्या दहा हजार रुपये मानधनामध्ये तीन हजार रुपयांची वाढ होऊन तेरा हजार रुपये मानधन व 1600 ते 2000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता. तर अंगणवाडी मदतनिसांच्या पाच हजार रुपयांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ होऊन 7500 रुपये मानधन व 800 ते 1000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मागील अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी होती. त्यासाठी त्यांचे कायम आंदोलने, मोर्चे सुरूच होते. त्यांनी मागील वर्ष डिसेंबर ते या वर्षी जानेवारीदरम्यान 52 दिवसांचे आंदोलनही केले होते. अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश आले व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मानधन वाढीवर शिक्कामोर्तब झाले. ऐन नवरात्रीच्या पर्वावर अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता अशी. डबल भेट मिळाल्याने त्यांना आनंद झाला होता परंतु हा आनंद नावापुरताच राहिला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका यांची ११०५५६ अंगणवाडी मदतनीस यांची ११०५५६ अशी एकूण २२१११२ मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत. अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा ६०% व राज्य शासनाचा हिस्सा ४०% असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिश्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते.
राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात जी वाढ केली होती ती मोठ्या संघर्षाने आम्ही मिळवली होती. त्यासाठी गेले वर्षभराने विविध मोर्चे, आंदोलने केली होती. मानधन वाढीचा निर्णय लवकर अमलात आला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनात उतरू. _ मदिना शेख, जिल्हा अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस संघ