गुन्हेगारी
गावठी कट्ट्यासह सराईत जेरबंद
नेवासा तालुक्यातील घटना; घोडेगाव-चांदा रोडवर आवळल्या मुस्क्या; सोनई पोलीस स्टेशनची कारवाई

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या सराईत आरोपीस काल दि. (1 मार्च) रोजीच्या मध्यरात्री सोनई पोलिसांनी जेरबंद करण्यात केले. आरोपीकडून गावठी कट्ट्यासह सात जिवंत काडतुसे व कार असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची विस्तृत हकीगत अशी की, शनिवार (दि.1 मार्च) रोजी रात्री 10.30 वा. सोनई पोलीस स्टेशनचे स.पो.नि. विजय माळी यांना गोपनीय बातमी मिळाली की, शिवतेज शिवाजी जावळे वय 30 वर्षे रा. चांदा ता. नेवासा हा त्याचे पांढरे रंगाचे वॅक्स वॅगन वेंटो कार (एम.एच 20 सी.एच 1545) मध्ये गावटी कट्टाजवळ बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली होती.
स.पो.नि. विजय माळी यांनी सोनई पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन सापळा लावून दि. दोन मार्च रोजी रात्री 12.20 वा. सुमारास घोडेगाव शिवारातील घोडेगाव ते चांदा जाणारे रोडवर धनगरवस्तीकडे रोडचे फाट्याजवळ एक पांढरे रंगाचे वॅक्स वॅगन वेंटो कार (एम.एच 20 सी.एच 1545) ही उभी असल्याची दिसली. सदर गाडीजवळ छापा टाकण्यासाठी जात असताना सदर सराईत आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो गाडीचे खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा त्यास पाठलाग करुन ताब्यात घेत असतांना त्याने झटापट करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याची व कारची झडती घेतली असता त्याच्याकडे एक स्टिल बॉडी असलेला गावठी बनावटीचा, त्याचे बटवर काळे रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला कट्टा किंमत अंदाजे 50 हजार रुपये, सात जिवंत काडतुस त्याचे पाठिमागील बाजुस इंग्रजीमध्ये KF 7.65 असे कोरलेले असलेले किंमत 350 रुपये, पांढऱ्या रंगाची वॅक्सवॅगन वॅटो कार (एम.एच 20 सी.एच 1545) किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख 50 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.
पो.कॉ. ज्ञानेश्वर आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदर आरोपी विरुद्ध सोनई पोलीस स्टेशन येथे गुरनं. 50/2025 भारतीय न्याय संहिता कलम 132, आर्म अॅक्ट 3,5,7/25 मु.पो. अॅक्ट 37 (1), 37 (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपी शिवतेज जावळे सराईत गुन्हेगार असुन याचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई स.पो.नि. विजय एस. माळी, पो.स.ई सुरज मेढे, श्रेणी पो.स.ई. के.बी. राख, पो.हे.कॉ. दत्ता गावडे पो.कॉ. ज्ञानेश्वर आघाव, पो.कॉ. क्षीरसागर, होमगार्ड विकास बोर्डे, उमेश इंगळे, मुन्ना शेख, हुसेन सय्यद, प्रशांत चव्हाण यांचे पथकाने केली.