नोकरी
नेवासा समन्वय समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन
तहसीलदारांना दिले निवेदन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहमदनगर जिल्हा शासकीय, निमशासकीय कर्मचारी व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक समन्वय समिती शाखा नेवासा यांच्यावतीने जुनी पेन्शन विना अट लागू करावी या मुख्य व इतर प्रलंबित मागणीसाठी पंचायत समितीच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्यातील 2005 नंतरचे सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार विषयी कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.
नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणात मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाविषयी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, उध्दवराव सोनवणे, सुनील दानवे, रामेश्वर चोपडे, राजेंद्र मुंगसे, संतोष भोपे, दशरथ ढोले, अरविंद घोडके, ग्रामसेवक संघाचे तालुकाध्यक्ष विलास काकडे, आरोग्य खात्याचे बाळासाहेब हिवाळे, ‘कंत्राटी’चे प्रशांत सुडके, ज्योती गाडेकर आदींनी भूमिका मांडली.
‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘हमारी युनियन हमारी ताकद’, घोषणा देत नेवासा तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, ग्रामसेवक, लिपिक, चतुर्थ कर्मचारी संघटना तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार यांच्या घोषणांनी नेवासा शहर दुमदुमले होते.