ब्रेकिंग
नेवासा नगरपंचायतसाठी 78.07% मतदान
नगराध्यक्षपदासह सतरा जागांसाठी मतदान संपन्न; 14 हजार 608 मतदारांनी बजावला आपला हक्क; दुपारनंतर मतदारांच्या लागल्या रांगा

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 20) मतदान झाले. 18 हजार 712 मतदार मतदारांपैकी 7417 पुरुषांनी मतदान केले तर 7191 महिलांनी मतदान केले. असे एकूण 14608 मतदान झाले आहे. त्याची टक्केवारी 78.07 एवढी आहे.
नेवासा नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी आज शनिवार (दि. 20) मतदान झाले. तर 21 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी सहा, तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 63 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी 18 हजार 712 मतदारांमध्ये 9292 पुरुष तर 9420 महिला मतदार आहेत. एकूण 22 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात पहिल्या दोन तासात साडेसात ते साडेनऊ पर्यंत केवळ 7.72% मतदान झाले होते. तर साडेअकरापर्यंत नेवासा शहरात केवळ 15.03% मतदान झाले होते. तर दीड पर्यंत 28.15% मतदान झाले होते साडेतीन वाजेपर्यंत 45.91% मतदान झाले होते. शेवटी एकूण मतदान 78.07 एवढे झाले.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या नगरपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि. 19) रात्री 10 वाजता थंडावल्या. मागील महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा व गाठीभेटींवर उमेदवारांनी भर दिला होता, आरोप-प्रत्यारोपांच्या आरोपांनी गाजलेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत फक्त तीन मोठ्या सभा झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय बिरादार, मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी शनिवारी शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली.
प्रशासनाने प्रशासकीय तयारी पूर्ण करून अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी, तसेच मतदान केंद्राबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रभाग निहाय मतदान
प्रभाग 1 – 668 (73.33 %)
प्रभाग 2 – 995 (80.69 %)
प्रभाग 3 – 852 (78.53 %)
प्रभाग 4 – 1115 (74.80 %)
प्रभाग 5 – 863 (75.37 %)
प्रभाग 6 – 629 (88.84 %)
प्रभाग 7 – 1098 (75.20 %)
प्रभाग 8 – 345 (79.68 %)
प्रभाग 9 – 1055 (75.14 %)
प्रभाग 10 -846 (77.26 %)
प्रभाग 11 – 809 (77.19 %)
प्रभाग 12 – 807 (75.42 %)
प्रभाग 13 – 975 (81.18 %)
प्रभाग 14 – 1067 (85.22 %)
प्रभाग 15 – 837 (76.50 %)
प्रभाग 16 – 741 (78.25 %)
प्रभाग 17 – 906 (79.68 %)
एकूण मतदान – 14 हजार 608



