खून प्रकरणातील दोघे आरोपी जेरबंद
नेवासा पोलिसांची कामगिरी; छञपती संभाजीनगरमध्ये केला होता खून; नेवासा हद्दीत लपले होते आरोपी

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यक्तीच्या खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना नेवासा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत ३० मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींनी एका व्यक्तीची हत्या करून घटनास्थळावरून पलायन केले होते.
या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची गोपनीय माहिती नेवासा पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे, नारायण डमाळे, अतुल शेळके, भारत बोडखे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी प्रसन्नजित प्रमोद हिवाळे (वय २०, रा. मुकुंदवाडी, सिडको एन-२, छत्रपती संभाजीनगर) आणि अरुण पदमसिंग भुल (वय १९, रा. एन-७, ओम प्राथमिक शाळेजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना नेवासा पोलीस ठाण्यात आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी सिडको पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या खून प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कलुबर्मे तसेच शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.



