google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

रेशनकार्डवर मिळणार मोफत साडी

दारिद्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ; 5 वर्षांसाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना

                                   स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून त्याचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
             राज्यातील दारिद्र रेषेखालील म्हणजेच पिवळी शिधापत्रिकाधारक (अंत्योदय) कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप होणार आहे.
355 रुपये असणार एका साडीची किंमत
राज्य शासनाकडून दिला जाणार निधी
 राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
5 वर्षांसाठी वस्त्रोद्योग विभागाची योजना
 वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
           राज्यात अंत्योदय शिधापत्रिका- धारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.
               
          शासन निर्णयात म्हटले आहे की, शासन निर्णय दि. ०२.०६.२०२३ अन्वये राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ ला मान्यता देण्यात आली आहे. यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल व दि.३१.०३.२०२८ पर्यंत वैध राहील असे नमूद केले आहे. सदर धोरणातील परिच्छेद क्र. ११(३) मध्ये ‘कॅप्टिव्ह मार्केट- राज्यातील दारिद्रय रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह यथावकाश एक योजना तयार करेल.’ असे नमूद केले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि. १७.०७.२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्रय रेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
         दिनांक ०२ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८’ जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात येत आहे.
        सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१११०१७१३४५०४०२ असा आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!