कृषीवार्ता
तूर पिकाची कृषी शास्त्रज्ञ डॉ. ढगे यांनी केली पाहणी
प्रवरासंगम शिवारातील बहारदार तूरीचे पीक; सहा महिन्यात ऊसाइतके पैसे
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम शिवारात शेतकरी केशव वाघमारे यांच्या शेतात तुरीच्या जोमदार पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मणराव सुडके व परिसरातील शेतकरी हजर होते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत ‘गोदावरी’ या तुरीच्या नवीन वाहनाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल वाघमारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. ढगे म्हणाले की, वाघमारे यांनी आमच्या सल्ल्याप्रमाणे सर्व काही कृषी तंत्रज्ञान वापरले. त्यामुळे सहा महिन्यात तुरीपासून शेतकऱ्याला ऊसाइतके पैसे मिळणार आहेत.
वाघमारे यांनी सांगितले की, प्रथम साडेचार फुटाची सरी पाडली. त्यानंतर दोन फुटावर टोकन पद्धतीने बियाची लागवड केली. चालू वर्षी 10 जून रोजी बीज प्रक्रिया करून लागवड केल्यामुळे उगवण चांगली झाली. शिवाय आंबवणीचे पाणी दिले होते.
डॉ. ढगे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कडधान्य प्रकल्पांतर्गत डॉ कुटे (कडधान्य शास्त्रज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोदावरी’ जात विकसित केली आहे. या वाणाचे विशिष्ट म्हणजे मर व बुरशीजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वाण 170 ते 180 दिवसात तयार होतो. आज वाघमारे यांना एकरी कमीत कमी 15 क्विंटल उत्पन्न होईल. त्यामुळे त्यांना उसाच्या इतके पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी तीन पाण्याची व्यवस्था केल्यामुळे पीक जोमदार आली असून फुले बहारदार फुलली आहेत. शेंगाही भरपूर आहेत. वादी लागण्याच्या अवस्थेमध्ये जैविक औषधाचा वापर केल्यामुळे कीड व रोग आले नाहीत. ढगाळ हवामान असतानासुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळीचा आता धोका राहिला नाही. नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून तुरीचे जोमदार पीक घेतल्याबद्दल केशव वाघमारे या शेतकऱ्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी शेतावर जाऊन कौतुक केले. शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाची पाहणी अवश्य करावी व बोध घ्यावा असे आवाहन डॉ. ढगे यांनी केले आहे.