नेवासा शहरात धाडसी घरफोडी
बंद घराचे कुलूप तोडून लाखांचा ऐवज लंपास; चार तोळे सोने, 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू व रोख 25 हजारांची चोरी
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन सुमारे चार तोळे सोन्यासह 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू व रोख 25 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना नेवासा शहरात घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत प्रभा प्रकाश मोदी (वय 48 धंदा-मजुरी. रा. नेवासा खुर्द) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी व माझा मुलगा स्वप्नील असे आमचे नातेवाईकांना भेटणेकरीता सकाळी 9 वाजण्याचे सुमारास आमचे राहते घराला कुलुप लावून जळगाव ता. जि. जळगाव येथे गेलो होतो. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 च्या सुमारास माझा भाचा ओंकार मापारी याने फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा मी त्याला घरामध्ये जाऊन खात्री करण्यास सांगितले असता त्याने मला सांगितले की, घरातील सामानाची उचका पाचक झालेली असून सर्व वस्तु अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत आहेत. तेव्हा आमचे घरी चोरी झाल्याचे आमचे लक्षात आले. त्यानंतर मी व माझा मुलगा स्वप्नील असे आम्ही जळगावहुन नेवासा येथे घरी येऊन पाहीले असता आमचे घराचे दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला.
मी व मुलगा स्वप्नील असे आम्ही घरात जाऊन पाहिले असता खालील वर्णनाचे व किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम पुढीलप्रमाणे- 9 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे (10 ग्रॅम) एक सोन्याचे लॉकेट, 8 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या, दोन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी, दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे 25 मणी, अडीच ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्यांचे दोन जोड, 100 ग्रॅम (दहा भार) वजनाच्या चांदीच्या वस्तू, 25 हजार रुपयांची रोख रक्कम असे एकूण 41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.