
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील पाचेगाव येथे आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आज शुक्रवार (दि. 16) रोजी सकाळी दहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांनी पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह पाहिला. त्यानंतर याची गावात चर्चा होऊन घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंबे, मनोज आहेर, विकास पाटील व पोलीस नाईक डमाळे यांनी येऊन अज्ञात व्यक्तीच्या प्रेताची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. पुढील पंचनामा करण्यासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पाठविण्यात आला.
खून झालेल्या अज्ञात व्यक्तीचे वय 35 वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसेच अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर महाकाल देवाचा फोटो गोंदलेला आहे. त्यामुळे खून झालेला व्यक्ती कोण व खून कोणी व कशासाठी केला असावा अशी नागरिकांत कुजबूज होती. नेवासा पोलीस पुढील तपास करत आहेत.