गुन्हेगारी
पाचेगाव येथील खून प्रकरणाचे गुढ उकलले
पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह ताब्यात; नेवासा पोलीस व एलसीबीच्या पथकांनी लावला छडा

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील पाचेगाव शिवारात झालेल्या हत्या प्रकरणाचा नेवासा पोलीस व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास लावण्यात यश मिळवले असून याप्रकरणी हत्या झालेल्या तरुणाच्या वकील पत्नीसह तिच्या प्रियकराला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व हत्या झालेली व्यक्ती जालन्यातील रहिवासी आहेत.

याबाबत माहिती अशी की, १६ ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारात शिवाजीराव पवार मेडिकल कॉलेजच्या जवळ शेतात एका अनोळखी इसमाचा कोणीतरी धारदार शस्त्राने गळा कापून खून केल्याचे आढळून आले होते. घटनेबाबत पोलीस पाटील संजय लक्ष्मण वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षकांनी नेमलेल्या दोन्ही पथकांनी आजुबाजुच्या लोकांना मयताची माहिती देऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर मयताची ओळख पटली नव्हती, त्यामुळे सदर मयत हा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची शक्यता असल्याने मयताचे फोटो महाराष्ट्रामधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच व्हॉटस्अॅप ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नेमलेल्या दोन तपास पथकांनी गुन्हा घडले ठिकाणापासून नेवासा श्रीरामपूर – रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपास आरोपींची माहिती काढत असताना घटना ठिकाणचे आजुबाजूस रॅनॉल्ट ट्रिबर गाडी संशयितरित्या फिरत असताना मिळून आली. सदर गाडी अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाई नगर, जुना जालना) याचे नावावर असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गाडी मालकाचा शोध घेत असताना त्याचा फोन मागील १५ ते २० दिवसांपासून बंद असल्याने त्याची पत्नी मिना अंबादास म्हस्के हिची माहिती काढली असता ती लोणी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. गुरुवार २९ ऑगस्ट रोजी लोणी (ता. इंदापूर जि. पुणे) येथे जाऊन मिना म्हस्के हिचा शोध घेत असताना ती एका इसमासह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे लहू शिवाजी डमरे (वय ३१) (रा. ढोकसळ, ता. बदनापूर जि. जालना) व मिना अंबादास म्हस्के (वय ३६) रा. रमाबाईनगर जुना जालना असे असल्याचे सांगितले. गुन्ह्याबाबत विचारपूस करता लहू शिवाजी डमरे याने त्याचे मिना अंबादास म्हस्के हिचेसोबत प्रेमसंबंध असून तिचा मयत पती अंबादास भानुदास म्हस्के हा नेहमी तिला चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्याने त्यास पुणे या ठिकाणी कामाकरिता जायचे आहे असे सांगून त्यास रेनॉल्ट ट्रिबर गाडीमध्ये घेऊन येऊन रात्रीच्यावेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा कापला व तेथून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली. आरोपींना पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, शरद बुधवंत, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भाग्यश्री भिटे यांचे एक पथक व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार राजू केदार, अरुण गांगुर्डे, आप्पा तांबे, नारायण डमाळे, अमोल कर्डिले, सुमीत करंजकर, गणेश जाधव, गणेश फाटक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

महिला आरोपी मिना म्हस्के ही कायद्याची पदवीधर आहे. व्यवसायाने वकील आहे. जालना येथील जिल्हा न्यायालय येथे एक वर्षे वकिली देखील केली आहे. पतीच्या खुनामध्ये पत्नीच सहभागी असल्याने मृतक अंबादास म्हस्के याची मिसींग कोणत्याही पोलीस ठाण्यात लिहिली गेली नाही. त्यामुळे मृतकची ओळख पटवणे आव्हान बनले होते, असे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.