स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाट्याजवळ त्रिमूर्ती संकुलाच्या जवळ असलेल्या ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली.
या अपघातात एक लहान मुलगी बचावली आहे. मयतांमध्ये आणखी एका लहान मुलीसह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक होते.
अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पडलेल्या टायरला धडकून चारचाकी गाडी त्रिमूर्ती संकुलाच्याजवळ असलेल्या ओढ्यात पलटी झाली. या अपघातात वसीम हारूण मुल्ला (वय ४१), अनसुरा बेगम हारूण मुल्ला (वय ६१) रा. छत्रपती संभाजीनगर तसेच रेश्मा हलदार (वय ३५), हसीना बेगम हारूण पठाण (वय ५४), सामीया मोमीन हलदार (वय १४) रा. आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे हे ठार झाले. तर मासुमा हलदार मोमीन हलदार (वय १३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.
नेवासा पोलिस ठाण्यात हारूण अमीर मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश ससाणे पुढील तपास करत आहेत.