गुन्हेगारी
विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
नेवासा तालुक्यातील घटना; पिकाभोवतीच्या कुंपणात सोडला होता विद्युत प्रवाह; दोघांवर गुन्हा दाखल
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : मका पिकाभोवती तारेचे कुंपन बांधून जंगली जनावरांपासून पिक संरक्षणासाठी त्यात सोडलेल्या विजप्रवाहाचा धक्का बसून शेजारील उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी आलेल्या तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन मका पिकाच्या शेतमालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मन्सूर महंमद पठाण (वय 29) धंदा-शेती रा. जळके खुर्द ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, रविवार 26 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता माझा मोठा भाऊ अजीज महंमद पठाण (वय 33) हा आमचे गावच्या शिवारातील गट नं. 220/4 मध्ये पाटचारीला पाणी आल्याने उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला मात्र त्याच्याशी फोनवर संपर्क न झाल्याने त्यास पाहण्यासाठी दुपारी साडेतीन वाजता शेतात गेलो असता तो शेतात दिसून आला नाही. शेताकडे येणारे पाणी कमी झाल्याचे दिसल्याने भाऊ अजीज हा पाटाच्या चारीकडे पाणी पाहण्यास गेला असावा असे वाटल्याने मी त्याचा चारीने शोध घेत जाताना मला अशोक पंढरीनाथ काळे यांच्या शेतातील मकाच्या बांधावर भाऊ अजीज पठाण हा पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला.
अशोक काळे यांचे शेतातील मकाचे पिकाचे जंगली जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी काठीच्या सहाय्याने लोखंडी तारेच्या केलेल्या कुंपनाला त्याचा हात व पायाला विद्युत शॉक लागलेला दिसला. तेव्हा मी अमोल आसाराम काळे यास फोन लावून माहिती देवून बोलावून घेतले तसेच वडील व चुलत भाऊ यांना बोलावून घेतले. भाऊ अजीज यास उपचारासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत असल्याचे सांगितले.
अमोल काळे व प्रवीण काळे दोघेही रा. जळका बुद्रुक ता. नेवासा यांनी बांधावर लोखंडी तारेचे कम्पाऊंड करुन त्यामध्ये अनधिकृतरित्या विद्युत प्रवाह सोडून जिवीतास धोका उत्पन्न होईल असे माहित असताना देखील सदर शेतास तारेच्या कम्पाऊंडमध्ये विद्युतप्रवाह सोडल्याने माझा भाऊ अजीज महंमद पठाण (वय 33) रा. जळके खुर्द याला लोखंडी तारेचा इलेक्ट्रीक शॉक लागून तो मयत झाला.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अमोल अशोक काळे व प्रवीण अशोक काळे या दोघांवर गुन्हा रजिस्टर 354/2023 भारतीय दंड विधान कलम 304, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.